सोलापूर : पोलिस भरतीची तयारी आता अंतिम झाली असून, २ जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरवात होणार आहे. शहर पोलिस दलाने पहिल्या दिवशी ६०० तर ग्रामीण पोलिसांनी २०० उमेदवारांना मैदानीसाठी बोलावले आहे. सुरवातीला चालक पदांची मैदानी चाचणी होणार आहे. त्यावेळी उमेदवारांकडे शैक्षणिक कागदपत्रे, आरक्षण, क्रिडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन, अजाची छायांकित प्रत, कॉल लेटर अशी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
ग्रामीण पोलिसांनी २ ते १० जानेवारीपर्यंत मैदानी परीक्षा घेण्याचे नियोजन केले असून ८ जानेवारीला एक दिवस सुटी राहील. ग्रामीण पोलिसांकडे २८ चालक पदांसाठी एक हजार ४२२ तर २६ पोलिस शिपाई पदांसाठी एक हजार ४५१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शहर पोलिस आयुक्तालयाकडे ७३ चालक पदांसाठी पाच हजार ५५८ आणि ९८ पोलिस शिपायांसाठी सहा हजार ६२१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.