नागपूर : कॅप राऊंडनंतर संस्थास्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल, अशी घोषणा तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानपरिषेदत केली. आमदार प्रविण दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेश घेतात. कॅप राऊंडनंतर संस्थास्तरावर प्रवेश दिले जातात. संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात नाही. अशा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क परत करण्यासाठी केलेले अर्ज तंत्र व उच्च शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून घेतले जात नाही.
शेवटच्या फेरीत पात्र होऊनही मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पूर्ण पैसे भरुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे कॅप राऊंडनंतर संस्थास्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ द्यावा, अशी मागणी आमदार दरेकर यांनी केली. त्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले, कॅम राऊंडमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणजे तो विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र नाही, असा एक समज होता. मात्र यापुढे असे न करता. संस्थास्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यासाठी कायद्यात आवश्यक तो बदल केला जाईल.