नागपूर : आरोग्य विभागातील रिक्तपदे भरण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत जाहिरात निघेल व त्यानुसार भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी विधानपरिषदेत सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे व उप केंद्रे येथील रिक्त पदांचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्याचे उत्तर देताना मंत्री सावंत यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, शिक्षण व आरोग्यावर अधिकाधिक निधी खर्च करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार राज्य शासन शिक्षण व आरोग्यासाठी अधिकाधिक निधीची तरतुद करणार आहे. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, प्रथम श्रेणी अधिकारी, क व ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. येत्या पंधरा दिवसांत त्याची जाहिरात काढली जाईल. त्यानुसार भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.