नागपूर : नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव यांच्या निलंबणाची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केली.
सोलापूर जिल्ह्यातील 22 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 68 उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबाबत सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ सावंत बोलत होते. डॉ. सावंत यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्राचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने नामंजूर झाला आहे. पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना बऱ्याचवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र परिपूर्ण प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव यांच्या निलंबणाची घोषणा सावंतांनी केली.
राज्यातील नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे. गरजा वाढत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रासाठी पदभरती, मशीनरी, अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. शिवाय या मोहिमांच्या कामासाठी सर्वकष कृती आराखडा तयार करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.