मुंबई : महाराष्ट्रातील महापुरुषांचे नाव आणि त्यांच्या कार्याचे देशभरात आदराने स्मरण केले जाते. मात्र, याच महापुरुषांबाबत राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवय रहाणार नाही असा इशारा शरद पवार यांनी दिला. महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवावाच लागणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
महाविकास आघाडीच्यावतीने महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल आणि भाजप नेत्यांविरोधात आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल आणि भाजपवर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी म्हटले की, आपण आज महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण एकत्र आलो आहोत. ज्यांच्या हातात सत्तेची चावी आहे. महाराष्ट्राचा महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. शिवाजी महाराज यांचं नावं आज साडे तीनशे वर्ष झाले तरी नावं अखंड आहे. त्यांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळेच आज लाखोंच्या संख्येने मोर्चा एकत्र आला आहे. जर माफी मागितली गेली नाही तर हा तरुण शांत बसणार नाही, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.