मुंबई : राज्यातील गोवर आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ११ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना होणार आहे. ज्याप्रकारे कोरोना काळात टास्क फोर्सने वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर लक्ष दिलं होतं, मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, त्याचप्रकारे गोवर साथीच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची 11 सदस्यीय टीम स्थापन होणार आहे.
राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांना याबाबत निर्देश दिले आहेत. 11 सदस्यांची ही टास्क फोर्स असेल, ज्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. यानुसार आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. या टास्क फोर्सच्या टीममध्ये संसर्गजन्य रोग तज्ज्ञांचा समावेश असेल. टास्क फोर्सच्या स्थापनेनंतर वेळोवेळी बैठका होतील आणि वाढती रुग्णसंख्य नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. गोवर साथीचा सर्वाधिक फैलाव मुंबईत झाला आहे. मुंबईत गोवर रुग्णांची संख्या 346 आहे. तर संशयित रुग्णांची संख्या 4355 वर पोहोचली आहे. यापैकी 117 बाळांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे, 16 बालकं ऑक्सिजन सपोर्ट असून 4 जण आयसीयूमध्ये आणि 3 बालकं व्हेंटिलेटरवर आहेत. आज 45 बाळांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.