येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) व जल जीवन मिशन अंतर्गत कामांचेउद्दिष्ट येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण नाही केले तर त्या तालुक्यातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जल जीवन मिशन स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) टप्पा – २ अंतर्गत सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन कार्यप्रणाली व पाणी गुणवत्ता विषयक फिल्ड टेस्ट किट वापर याविषयी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रशिक्षणामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे बोलत होते.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं./पा.व स्व.) इशाधीन शेळकंदे , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी , माढा गट विकास अधिकारी डॉ.संताजी पाटील, मोहोळचे आनंद मिरगणे ‘ पंढरपूरचे प्रशांत काळे , सांगोल्याचे सचिन खुडे , दक्षिण सोलापूरचे बाळासाहेब वाघ, माळशिरसचे विनायक गुळवे , उत्तरच्या डॉ.जस्मिन शेख जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांच्यासह सहाय्यक लेखाधिकारी , जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व बी.आर.सी.व सी.आर.सी.उपस्थित होते.
प्रास्तविकामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं./पा.व स्व.) इशाधीन शेळकंदे यांनी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन कार्यप्रणाली व पाणी गुणवत्ता विषयक फिल्ड टेस्ट किट वापराची माहिती अद्ययावत ठेवून काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले