मुंबई : शिवसेनेने बेईमानी केल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी अमित शाहांच्या कार्याचा आढावा घेताना, फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला.
2014 साली मिळालेले यश मोदीजींचे नेतृत्व आणि अमित शाह यांच्या कर्त्तृत्वामुळे आहे. राजकारणातील चाणक्य ही उपमा याच निवडणुकीमुळे मिळाली. कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यापर्यंत भेटी घेतल्या. गरिबापासून श्रीमतांपर्यंत विचार पोहोचवले. आपण शिवसेनेसोबत युती करायला तयार होतो. चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. 117 ते 118 जागा लढणाऱ्या भाजपाने 288 जागा एका दिवसात लढण्याचा निर्णय घेतला. याच कार्यालयात अमित भाई राहायचे त्यांच्या जोरावर आपण निवडणूक जिंकली.
अमित शाह भारताला मिळालेले बलशाली नेतृत्त्व
हे पुस्तक संग्रह करुन ठेवण्यासारखे आहे. पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलेही पान उघडले तरी ज्ञानवर्धक अशी पुस्तकाची रचना आहे. अमित शाह यांच्या विचारांचे आणि वाक्याचे संकलन पुस्तकात आहे. सारवर्धक आणि मूल्य वर्धन करणारी ही वाक्ये आहेत. जे पुस्तक वाचतील, त्यांना निश्चित प्रेरणा मिळेल. पक्षाची विचारधारा त्यांच्या वाक्यातून स्पष्ट होते. पक्षासाठी समर्पित नेतृत्व अमित शाह भारताला मिळालेले बलशाली नेतृत्त्व आहे.