नवी दिल्ली : तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला बिगर गांधी कुटुंबातील अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा मिळाली असून ते आज पदभार स्वीकारणार आहेत. यानिमित्त दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर खर्गेंच्या अभिनंदनाचे पोस्टर लागले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर काँग्रेसला आता कात टाकण्याची गरज असल्याचा सल्ला अनेक राजकीय तज्ज्ञांनी दिला. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हरल्यामुळे राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी अध्यक्षा होत्या. मात्र, त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद दुसऱ्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. हे पद राहुल गांधींनी स्वीकारावं अशी मागणी सोनिया गांधींसह काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी केली. मात्र, त्यांनी यासाठी नकार दिला. त्यामुळे तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी लागली. आतापर्यंत काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सहावेळा निवडणूक झाली आहे. यंदा, ही निवडणूक दुहेरी होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्या ही निवडणूक पार पडली. सर्वाधिक मतांनी मल्लिकार्जुन खर्गे यांने काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले.