येस न्युज नेटवर्क : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाकडून पुन्हा कुठलाही दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना पुन्हा सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली.पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊत यांनी आर्थिक घोटाळा केला असल्याचा ठपका ठेवत 31 जुलै रोजी ईडीने त्यांना अटक केली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. 1039 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी आज न्यायालयात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेचं चिन्ह आणि नाव गोठवल्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना पक्षाचे नवीन चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल आणि भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. आमच्यात शिवसेनेचं ‘स्पिरीट’ असल्याचे त्यांनी सांगितले. या आधीही जनसंघ, काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. यात काही नवीन नाही. नवीन चिन्हानंतर हे पक्षही मोठे झाले. आपणही मोठे होऊ असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. खरी शिवसेना कोणती आहे, हे लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे चिन्ह बदललं तरी लोक आपल्याशी जोडले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.