मुंबई : आव्हान कुणी कुणाला द्यायचे याबद्दल आरसा आणि आत्मचिंतन करण्याची उद्धव ठाकरे यांना गरज आहे. स्वतःच्या ताकदीवर तुम्ही कधी सरकार आणले का? 100 आमदार तुम्ही आणलेत का कधी निवडून? ज्या अमित शाह यांनी 100 च्यावर आमदार आणले, त्यांना तुम्ही आव्हान करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
आदित्य ठाकरेंच्या आक्रोश मोर्चावर निशाणा
आदित्य ठाकरे यांच्या तळेगाव येथील आंदोलनावर आशिष शेलार यांनी टीकेचा बाण सोडला. आदित्य यांनी आधी किती टक्केवारी घेतली हे सांगावं, त्यांच्यामुळे वेदांत प्रकल्प बाहेर गेला आहे, असा टोला शेलार यांनी लगवाला. कुठलीही लढाई जिकण्याआधी आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकिला सामोरे जावे, असेही शेलार म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या पेंग्विन सेनेची भूमिका लोकांना भ्रमित करणारी असून मराठी – गुजरातीचा वाद आणि द्वेष निर्माण करत आहेत. चहाच्या ऐवजी आणखीन काही घ्यायचं ठरवलं आहे असं दिसतंय ते धादांत खोटं बोलत आहेत, असे शेलार म्हणाले.
दसरा मेळाव्यावर काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळालं, यावर विचारलं असता आशिष शेलार म्हणाले की, या प्रकरणाशी आमचा काय संबंध आहे. प्रकरण शिंदे गट आणि पेग्विंन सेना मध्ये होते. त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही. ज्यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तीच खरी शिवसेना आहे.