मुंबई : संजय राऊत यांनी कलम 3 नुसार परिभाषित केल्यानुसार 3,27,85,475/- रुपयांच्या गुन्ह्यांमध्ये जाणूनबुजून स्वत: लाँडरिंग केले आहे आणि ते पीएमएलए, 2002 च्या कलम 4 अंतर्गत शिक्षेस पात्र आहेत. संजय राऊत हे प्रविण राऊत यांच्यामार्फत गोरेगाव सिद्धार्थ नगरच्या पुनर्विकासात थेट सहभागी होते. संकल्पनेच्या टप्प्यापासून ते कार्यान्वयित होईपर्यंत त्यांनी प्रकल्पात सहभाग घेतला, असं ईडीने आरोपपत्रात म्हणलं आहे.
2006-07 साली संजय राऊत यांनी तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रा चाळ पुनर्विकासासाठी म्हाडा अधिकारी आणि इतरांसह बैठकांना आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर राकेश वाधवान यांनी मेसर्स गुरूआशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडमार्फत पत्रा चाळ पुनर्विकास करण्यासाठी आणले, असा दावाही ईडीने केला आहे.
प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यासाठी संजय राऊत यांनी प्रविण राऊत यांना त्यांचे प्रॉक्सी आणि विश्वासपात्र म्हणून समाविष्ट केलं. मनी ट्रेलच्या तपासात प्रविण राऊत या संजय राऊत यांच्या प्रॉक्सीने एचडीआयएलकडून त्याच्या बँक खात्यात 112 कोटी रुपये प्राप्त केले. पुढे हे पैसे मालमत्ता संपादन करणे, त्याच्या व्यावसायिक संस्था, कुटुंबातील सदस्यांच्या खात्यात वळवणे इत्यादींमध्ये हस्तांतरित केले. अशाप्रकारे संजय राऊत हे जाणूनबुजून गुन्ह्यातील उत्पन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आणि मालमत्तेचे संपादन करण्यासाठी आणि इतर संस्थांकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत सामील होते, असा ईडीचा आरोप आहे. किहीम, अलिबाग येथील जमीन खरेदी करताना संजय राऊत यांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वापरली, हे तपासात पुढे आलं आहे. याची विक्रेत्यांनीही पुष्टी केली आहे. खासदार म्हणून संजय राऊत यांना महिन्याला 1 लाख 85 हजार आणि सामना वर्तमानपत्रात काम करतात तिथे 1 लाख रुपये पगार मिळतो. त्यांच्या पत्नी वर्षा या शिक्षिका असून त्यांना महिन्याला 80 हजार पगार मिळतो. राऊत नोकरीशिवाय कोणताही व्यवसाय करत नाहीत, असं ईडीने त्यांच्या आरोपपत्रात नमूद केलं आहे.