सोलापूर : समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आडे हे पदभार स्विकारल्यापासून अनेक मागासवर्गीय संस्थांना वेठीस धरून खोटे नाटे आरोप करुन कोट्यवधी रुपये उकळत आहेत. त्यामुळे भटक्या विमुक्त समाजाच्या संस्था अडचणीत येत आहेत, त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आडे हे समाज कल्याणच्या खात्या अंतर्गत असलेल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे दरमहा न करता तीन-तीन महिन्यातून एकदा करीत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ येत आहे. टक्केवारीप्रमाणे मलीदा घेऊन जे थकीत वेतन बिले आहेत ते मंजूर करतात. मागासवर्गीय संस्थांना वेठीस धरणाऱ्या कैलास आडे यांची समाज कल्याण कार्यालयातून बदली करुन त्याची चौकशी करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय विभाग (मुंबई) यांना पाठवण्यात आल्या आहेत.