मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तिस्ता सेटलवाड या मागील दोन महिन्यांपासून गुजरात पोलिसांच्या कोठडीत आहेत. दोन महिन्यांपासून आरोपी महिला पोलीस कोठडीत असून पोलिसांनी चौकशीदेखील केली आहे. त्यामुळे अंतरिम जामीन देणे योग्य ठरले असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. गुजरात दंगलीबाबत गुजरात सरकारविरोधात खोटे आरोप करणे, खोटी कागदपत्रे सादर करणे आदी आरोप तिस्ता सेटलवाड यांच्याविरोधात आहेत.
सरन्यायाधीश उदय लळीत, न्या. एस. रविंद्र भट आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर तिस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्जाची सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने म्हटले की, मागील दोन महिन्यांपासून आरोपी महिला तुरुंगात आहे. त्याशिवाय, पोलिसांनी त्यांची सात दिवस चौकशीदेखील केली. तिस्ता सेटलवाड यांच्याविरोधातील आरोप हे 2002 मधील प्रकरणाशी आहेत. तर, 2012 पर्यंत कागदपत्रे सादर करण्यात आली नव्हती. महिला आरोपीची कोठडीत चौकशी करण्यात आली. तपासाच्या अनुषंगाने चौकशीच्या काही महत्त्वाच्या घटकांची पूर्तता झाल्याने अंतरिम जामिनावरील सुटका करणे योग्य ठरते असे खंडपीठाने म्हटले.