मुंबई : वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशा चर्चा सुरु झाली आहे. कारण केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे नेते मोहित कंबोजही तिथे आले, त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाली. सध्या त्या हैदराबादमध्ये सीआयएसएफमध्ये कार्यरत आहेत. काल त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर असताना भाजप नेते मोहित कंबोजही तिथे पोहोचले त्यामुळे विरोधकांनी यावरुन टीकास्त्र सोडले.