जॉन येवलेकर सारख्या हरहुन्नरी निवेदकाचा नावाने निवेदकांचा सन्मान तोही एका निवेदकाच्या हस्ते हा दुर्मिळ क्षण : सुधीर गाडगीळ
सोलापूर,(प्रतिनिधी):- सोलापूरच्या जॉन येवलेकर या उत्कृष्ट निवेदकाच्या नावाने यंदाच्या वर्षीपासून राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदकांना पुरस्कार देण्यात आला आणि तोही एका निवेदकाच्या हस्ते हा दुर्मिळ क्षण आहे असे प्रतिपादन आद्य मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी केले. सर जॉन येवलेकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सर जॉन येवलेकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर जॉन येवलेकर उत्कृष्ट राज्यस्तरीय निवेदक पुरस्काराचे वितरण गुरूवार दि. 11 ऑगस्ट रोजी बालाजी सरोवर येथे त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे, रेव्ह.विकास रणशिंगे, रेव्ह. ईमान्युएल म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोणत्याही कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असतो तो निवेदक आणि निवेदकाच्या सूत्रसंचालन करणाऱ्याच्या अंगी वाचन, अभ्यास आणि स्मरणशक्ती चांगली असणे आवश्यक आहे. जॉन येवलेकर हे सामाजिक प्रथा रूढी याच्या विरोधात भाष्य करणारे आणि राजकीय प्रहार करणारे उत्कृष्ट निवेदक होते त्याचबरोबर चांगले कलाकार होते. एका निवेदकाच्या हस्ते निवेदकाच्या नावाने निवेदकांना पुरस्कार देवून सन्मान होत आहे हा दुर्लभ क्षण आहे असेही सुधीर गाडगीळ यांनी यावेळी आपल्या मनोगतामधून सांगितले.
निवेदक हा कार्यक्रमाचा आत्मा असतो. कार्यक्रमामध्ये वक्ते आणि नेत्यांना सांभाळून घेण्याची क्षमता निवेदकामध्ये असते त्यामुळे आमच्या सारख्या राजकीय व्यक्तींना चांगला निवेदक असेल तर कसलीच काळजी नसते असे आपल्या भाषणातून आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.प्रारंभी रेव्ह. विकास रणशिंगे यांनी प्रार्थना सादर केली. त्यानंतर सर जॉन येवलेकर प्रतिष्ठानच्या सचिवा रूपश्री येवलेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून जॉन येवलेकर प्रतिष्ठान आणि जॉन येवलेकर यांच्याबाबत माहिती दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर जॉन येवलेकर उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेले अकबर शोलापुरी, शोभा बोल्ली, सुनिता पॉल आणि स्वप्नील रास्ते यांचा सुधीर गाडगीळ, आ. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना सुनिता पॉल यांनी सांगितले की लहानपणापासून मला निवेदन करण्याची संधी मिळाली चुकत चुकतच सुधारणा होवून निवेदन करण्याचा प्रयत्न केला सुधीर गाडगीळ यांच्याकडून प्रेरणा घेवून निवेदन करत गेले. तर शोभा बोल्ली यांनी सांगितले की माझी मातृभाषा कन्नड तर सासरकडील तेलगू भाषा परंतु शिक्षण घेत असताना मराठीची ओळख झाली आणि त्यातून वाचन आणि वाचनातून निवेदन असा प्रवास झाला. त्यानंतर स्वप्निल रास्ते म्हणाले मी पुण्यात जरी जन्मलो तरी माझी कर्मभुमी सोलापूर आहे. जॉन येवलेकर यांच्याकडून मी सोलापूर मध्ये आल्यावर अनेकदा भेटून निवेदन आणि कविता शेर शायरी हे शिकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बोलताना अकबर शोलापुरी यांनी मी सोलापूर मधून प्रेरणा घेवून मुंबईला गेला तेथेही मला जॉन सरांची मदत भरपूर मिळाली असे आपल्या मनोगतामधून सांगितले.
सोलापूरचे पण पुण्यात स्थायिक झालेले गायक सतीश वैद्य यांनीही आपल्या मनोगतामधून सर जॉन येवलेकर यांच्याबद्दलचे किस्से अनेक विनोद सांगत विनोदाची निर्मिती जॉन येवलेकर कसे करायचे याचे कथक केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जॉन येवलेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष फिलीप नदवी, सचिवा रूपश्री येवलेकर, उपाध्यक्ष शशिकुमार तेलंग, सहसचिव मंजुश्री येवलेकर, खजिनदार तेजश्री येवलेकर, सदस्य किरणकुमार इरनाळे, मायकल नदवी यांनी विशेष परिश्रम घेतले.
तब्बल तीन तास सुरू असलेला हा कार्यक्रम अत्यंत दिमाखदार आणि नीटनेटका झाला. रंगमंचाची सजावट गुरू वठारे आणि किशोर रच्चा यांनी केली तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ यांनी केले तर आभार प्रदर्शन तेजश्री येवलेकर यांनी व्यक्त केले. शेवटी रेव्ह. ईमान्युएल म्हेत्रे यांनी प्रार्थना सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली.