राज्याच्या विधीमंडळाचं अधिवेशन बुधवार, 10 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तशा आशयाचं परिपत्रक विधीमंडळ सचिवालयाकडून काढण्यात आलं असून त्यासाठी मंगळवारची मोहरमची शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे. या दिवशी विधीमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
राज्याच्या विधीमंडळ सचिवालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, सचिवालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र विधीमंडळाचे आगामी अधिवेशन बुधवार, दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजीपासून विधान भवन, मुंबई येथे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाकरीता मंगळवार, दिनांक 09 ऑगस्ट, 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी विधानमंडळ सचिवालयाचे कार्यालय सुरु राहील. तसेच मंगळवार, दिनांक 09 ऑगस्ट ते गुरुवार, दिनांक 18 ऑगस्ट, 2022 या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या असून उपरोक्त कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य आहे.