मुंबई : पत्राचाळ प्रकरणी ईडी कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशीरा ईडीनं अटक केली होती. तेव्हापासून राऊत ईडी कोठडीत होते. न्यायालयानं राऊतांना दुसऱ्यांदा सुनावलेली ईडी कोठडी आज संपत असल्यानं संजय राऊतांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. राऊतांप्रमाणेच त्यांच्या पत्नी वर्षा राऊतही ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. दरम्यान संजय राऊतांच्या वकिलांकडून आज पुन्हा जामिनाची मागणी करण्यात आली. संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहाराची चौकशी करायची असल्यानं गेल्यावेळी ईडीनं राऊतांची कोठडी वाढवून मागितली होती.
पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडी कोठडी संपल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. तिथे ईडीनं त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांची रवानगी आता आर्थर रोड कारागृहात होणार आहे. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं आहे. पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना 31 जुलैंच्या मध्यरात्री अटक झाली. त्यानंतर गेले 8 दिवस ईडीच्या कोठडीत त्यांची चौकशी सुरू होती.