महसूल कामाबरोबर विकासाची कामे, योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
सोलापूर : महसूल विभागाने कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावली असून नागरिकांना पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि कालबद्धरितीने सेवा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. महसूल कामासोबत विकासाची कामे, योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
रंगभवन येथे महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांच्या गुणगौरव समारंभप्रसंगी श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, बालाजी अमाईन्सचे संचालक राम रेड्डी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रमुख पाहुणे निवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्यासह उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, महसूल विभाग राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाचे प्रतिनिधित्व करणारा विभाग आहे. कोरोनाच्या काळात महसूल विभागाने अहोरात्र काम करुन नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेमडेसिव्हीर औषधाचा पुरवठा, अन्नधान्य वितरण, ऑक्सिजनचा पुरवठा, खाटांची व्यवस्था आदी सोई-सुविधा उपलब्ध करुन दिल्या. हा विभाग सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करीत आहे. विकासाच्या कामात महसूल विभागाचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी प्रत्येक विभागांशी समन्वय महत्वाचा आहे. संगणकीकरण झाले तर कोणाचेही काम संपणार नाही, त्यावर पर्यवेक्षण करावेच लागणार आहे. सध्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठका होत आहेत, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण वावरत असताना ते सर्वांनी आत्मसात करणे हिताचे आहे. कोणतेही काम नियमाने करा. जनतेच्या कामाप्रती पारदर्शी राहून महसूल कर्मचारी गृहनिर्माण सोसायटीसाठी प्रत्येकांनी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
सुंदर माझे कार्यालयाबाबत सर्वांनी उत्कृष्ठ काम केले आहे. उर्वरित कार्यालयांनीही सहभाग नोंदवावा. सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, स्थानिकस्तरावरच त्यांच्या कामाचा निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
डॉ. कुंडेटकर यांनी महसूल नियमातील बदल, कायदे, आव्हाने, फॉर्म नं.14, ई-पीक पाहणी, गाव नमुना5, ई चावडी, ई फेरफार, मृत्यूपत्र, तुकडे बंदी, कुळ कायदा याबाबत सविस्तर माहिती दिली.
मन, शरीर तंदुरूस्त ठेवा – दिलीप स्वामी
स्वामी यांनी सांगितले की, नागरिकांचे वाद, तंटे मिटविण्यसाठी महसूल विभाग काम करीत असतो. त्यामुळे महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी मोठी आहे. नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्वांनी चांगले काम करावे. कामाच्या व्यापात आपले मन, शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. महसूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे व्हावीत. सकस आहार, सूर्यप्रकाश, भरपूर पाणी, न्यायाम आणि मनशांती याकडे कानाडोळा न करता या गोष्टी अंगिकारल्या पाहिजेत. चांगले काम केले तरच प्रत्येकाला सुख आणि आनंद मिळेल.
अपर जिल्हाधिकारी श्री. जाधव म्हणाले, नागरिक महसूल विभागाकडे शासन या भावनेने बघतात. नागरिकांचे वाद, तंटे मिटविण्यसाठी महसूल विभाग काम करीत असतो. त्यामुळे महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी मोठी आहे.
1134 गावात देणार डिजीटल नकाशा
रेड्डी यांनी सांगितले की, गावच्या नकाशाची माहिती नागरिकांना महत्वाची असते. बालाजी अमाईन्स जिल्ह्यातील 1134 गावात डिजीटल नकाशा देणार आहे. शिवाय नकाशे अपडेट ठेवण्यासाठी त्यासोबत सीडीही देण्यात येईल. याचा उपयोग गावकऱ्यांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पवार यांनी प्रास्ताविकात महसूल दिनाचे महत्व, का साजरा केला जातो, याबद्दल सांगितले. आपल्या कामाची आजची कार्यपद्धती बदलली असून कधीही ऑनलाईन बैठका होत असतात, यामुळे प्रत्येकांनी सदैव तत्पर राहायला हवे, असे सांगून जिल्ह्यात महसूल विभागाने केलेल्या कामांचा आढावा घेतला.
यावेळी पोलीस आयुक्त श्री. माने यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रत्येक कर्मचारी, अधिकारी यांना उत्कृष्ठ काम केल्याची पावती देणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले.
यावेळी 9 ते 12 मध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त आणि विशेष प्राविण्यप्राप्त महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रातिनिधीक स्वरूपात उत्तर सोलापूर अकोलेकाटी, बाळे आणि बसवेश्वरनगर, दक्षिण सोलापूरमधील आचेगाव, अकोले-मंद्रुप, बरूर आणि मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड, बोपले, एकुरके तलाठी कार्यालयाला मान्यवरांच्या हस्ते डिजीटल नकाशे देण्यात आले. हे नकाशे बालाजी अमान्सने तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत, याबद्दल रेड्डी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.