नवी दिल्ली : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात विविध भागात जाण्यासाठी 26 नवीन उड्डाणे सुरु होणार आहे. यामुळे आता विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. स्पाईसजेटने देशांतर्गत 26 विमान उड्डाणे सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लोकांना विविध शहरात जाण्याची संधी मिळणार आहे. परिणामी विमान भाडही कमी होण्याची अपेक्षा आहे.
या 26 शहरांमध्ये सुरु होणार उड्डाणे
स्पाइसजेट कंपनीने मंगळवारी यासंदर्भातील घोषणा केली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, 22 जुलैपासून 26 नवीन देशांतर्गत विमान उड्डाणे सुरु होणार आहेत. मुंबई-गुवाहाटी, झारसुगुडा-मदुराई, नाशिक-दिल्ली, हैदराबाद-जम्मू, कोलकाता-जबलपूर मार्ग आणि वाराणसी-अहमदाबाद या नवीन मार्गांची नावे आहेत. याशिवाय अमृतसर-अहमदाबाद, दिल्ली-हैदराबाद, अहमदाबाद-जयपूर आणि दिल्ली-धर्मशाला या मार्गांवर आधीपासून चालणाऱ्या फ्लाइटची संख्याही वाढवण्यात येणार आहे.