नवी दिल्ली : विधानसभेनंतर आता शिवसेना विरुद्ध शिंदे गटाची लढाई दिल्लीमध्ये सुरू झाल्याचं चित्र आहे. संसदेतलं शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या असून तसं एक पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात कार्यालयाचा ताबा देण्याची ही मागणी करण्यात आली आहे. दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचं सांगत गटनेतेपदावरही शिंदे गटाने दावा केला.
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन तृतीयांश आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर आता लोकसभेमध्येही तशाच हालचाली सुरू झाल्या आहेत. आपल्याकडे दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे लोकसभेतील शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा आपल्याला मिळावा असं पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलं आहे. संसदेमध्ये प्रत्येक पक्षाला एक कार्यालय देण्यात येतं. तसंच शिवसेनेलाही संसदेत कार्यालय देण्यात आलं आहे. शिंदे गटाने आता हे कार्यालय आपल्याला मिळावं अशी मागणी शिंदे गटाने केली आहे.