मुंबई : शिवसेनेत सुरू असलेले बंडखोरीचे लोण आता खासदारांमध्ये पसरण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेच्या 18 लोकसभेच्या खासदारांपैकी 11 खासदार शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएच्या उमेदवाराला मतदान करावे अशी मागणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. शिवसेनेकडून सध्या विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला जाणार असल्याची शक्यता आहे.
खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या या आधीच्या भूमिकेची आठवण करुन दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी याधी पक्षभेद न पाळता राज्याची कर्तृत्ववान महिला असलेल्या प्रतिभा पाटील यांनी देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावं यासाठी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्याशिवाय, प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीचा आदर करत त्यांनाही पाठिंबा दिला होता. आता हीच परंपरा कायम ठेवावी आणि आदिवासी समाजातील एका महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा केली आहे.