राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभर राबविलेल्या मोहिमेत एकूण १२ गुन्हे नोंद करण्यात आले असून ४०५ लिटर हातभट्टी दारू, १६ लिटर देशी दारू, ३ लिटर विदेशी दारू, ३० लिटर ताडी व ३५० लिटर फ्रुट बियर सह एक लाख 71 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सोलापूर मिलिंद शंभरकर यांचे आदेशानुसार अवैध दारू विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक 4 जुलैपासून मोहीम सुरू केली असून सदर मोहिमेसाठी जिल्हाभरात सहा पथके तैनात करण्यात आलेली आहे. पाच जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अ१ विभागाचे दुय्यम निरीक्षक देशमुख यांनी सोलापूर शहरात सात रस्ता ते एम्प्लॉयमेंट चौक रोडवर एका मोटरसायकल वरून हातभट्टी दारूची वाहतूक होत असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार पाळत ठेवली असता एका हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकलवर एक संशयित इसम दोन रबरी ट्यूब मध्ये हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आला. सदर इसमास थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने मोटरसायकल जागेवरच सोडून तिथून फरार झाला. सदर गुन्ह्यात १४० लिटर हातभट्टी सह एकूण ७७,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. दुय्यम निरीक्षक अ २ विभाग श्रीमती मिसाळ यांनी 5 जुलै रोजी पहाटे सहाच्या सुमारास गोंधळे वस्ती ते गांधी रोड, अक्कलकोट रोडवर एका हिरो होंडा कंपनीच्या मोटरसायकलवर 80 लिटर क्षमतेच्या दोन रबरी ट्यूब मध्ये हातभट्टी दारूची वाहतूक करताना गुन्हा नोंदवला असून सदर आरोपी मोटरसायकल टाकून पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. सदरच्या कारवाईत 58 हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

तसेच पाच जुलै दुपारी तीन वाजेच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दुय्यम निरीक्षक अ २ विभाग मिसाळ यांनी सोलापूर शहरातील आशा नगर एमआयडीसी रोड येथील एका राहत्या घरामध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी राजू कोंकोंडा, राहणार गणेश मंदिर जवळ, श्रमजवी नगर त्याचे ताब्यातून 650 मिली क्षमतेचे 45 कागदी बॉक्समध्ये ओम साई श्री ड्रिंक्स असे लेबल असलेले फ्रुट बियरच्या 540 बाटल्या ज्याची अंदाजे किंमत 16,200 इतकी आहे मुद्देमाल जप्त केला असून सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तसेच सोलापूर जिल्ह्यात पालखी मार्गावरील तैनात पथकांनी मौजे वेळापूर तालुका माळशिरस या ठिकाणी दुय्यम निरीक्षक सांगोला श्री छत्रे यांनी त्यांच्या पथकासह हॉटेल गणेश या धाब्यावर धाड टाकली असता त्या ठिकाणी जितेंद्र मधुकर गंभीरे, राहणार अकलूज याच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या देशी दारू च्या 25 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून वेळापूर एसटी स्टँड पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये आरिफ वजीर पठाण हा इसम देशी दारूची अवैध विक्री करताना आढळून आल्याने त्याच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या 35 बाटल्या व ३५ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. सदर दोन्ही कारवाईत रुपये ६,३२०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
एका अन्य कारवाईत
निरीक्षक पंढरपूर व दुय्यम निरीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने तीन गुन्हे नोंदविले असून पंढरपूर शहरामधील हनुमान नगर येथे शंकर महादेव हेगडे याच्या ताब्यातून वीस लिटर ताडी जप्त केली असून पंढरपूर शहरामधील संत पेठ भागात बडवेचर झोपडपट्टीमध्ये एका पत्राचे शेड मधून सुभाष सोपान वाघमारे याच्या ताब्यातून 25 लिटर हातभट्टी जप्त केली आहे, तसेच मौजे वाखरी गावाच्या हद्दीत अमोल प्रल्हाद गुजर याच्या राहत्या घरातून पंधरा लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. सदर तिन्ही गुन्ह्यात 2540 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदरची कारवाई निरीक्षक श्री मुळे, दुय्यम निरीक्षक कोळी, जवान शेरखाने, रोडे व सहायक दुय्यम निरीक्षक मुंढे यांनी केली.
दुय्यम निरीक्षक करमाळा यांच्या पथकाने येलमवाडी रोडवर, पाचफुलेवाडी तालुका माढा या ठिकाणी एक वारस गुन्हा नोंदविला असून माधव पंढरी पाचफुले याच्या राहत्या घरातून 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या तीस बाटल्या व मॅकडॉल नंबर वन विदेशी दारूच्या १८० मिली क्षमतेच्या 16 बाटल्या असा एकूण चार हजार आठशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर कारवाई दुय्यम निरीक्षक श्री पाटील व जवान वडमिले यांनी केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आषाढी वारी निमित्त अवैध दारू विक्री, वाहतूक व निर्मिती तसेच हातभट्टी दारू विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांचे परिसरात अवैध दारू विक्री, निर्मिती, वाहतूक होत असल्यास त्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास द्यावी.