1 हजार हरिपाठ ग्रंथाचे मोफत वाटप
सोलापूर – संत मुक्ताई यांनी ज्ञानदेव, नामदेव, चांगदेव या तिघांना उद्देशून बोध करून वारकरी परंपरे मध्ये क्रांती केली आहे. त्यातील एक पाऊल म्हणजे हरिपाठ होय. तो हरिपाठ मुक्ताईनी सुद्धा सोळा अभंग लिहून प्रकाशित केला आहे. कारण संत अवतार घेऊन जड जीवांचा उद्धार व्हावा यासाठी प्रयत्न करतात. प्रत्येक व्यक्तीने योग्य मार्गाने जीवनाचा प्रवास करावा. संसार कसा करावा, संसार म्हणजे काय, संसारातील प्रवृत्ती कशी असावी. संसार करत परमार्थ कसा करावा, अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे अभंगाच्या माध्यमातून दिली आहेत. ” मार्ग दाऊनी गेले आधी | दया निधी संत ते ||” समाजाला योग्य मार्ग दाखवून कर्तव्याची जाण निर्माण करून देऊन श्रेष्ठ फल प्राप्त करून देणारे संत हरिपाठ या संकल्पनेतून सर्व सामान्यां पासून उत्तम अधिकाऱ्या पर्यंत सर्वाना नाम महतीचे संस्कार करतात.
हरिपाठ हा ग्रंथ समाजासाठी खूप उपयुक्त असून मनशांतीसाठी गरजेचा आहे असे मनोगत ह भ प निवृत्ती महाराज नामदास ( संत नामदेव महाराज विद्यमान वंशज ) पंढरपूर यांनी संत मुक्ताई हरिपाठ ग्रंथ प्रकाशन सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले. श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान, सोलापूर यांचे माध्यमातून संत मुक्ताई मंदिर, कोठे नगर, सोलापूर या ठिकाणी प्रकाशन सोहळा आयोजित केला होता.या हरिपाठ ग्रंथाचे तीन आवृत्ती प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
725 व्या संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळ्या निमित्त या चौथी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. 1000 ग्रंथ मोफत वाटप केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी ह. भ.प.अनंत इंगळे महाराज अध्यक्ष स्थानी होते. ह भ प निवृत्ती महाराज नामदास ( संत नामदेव महाराज विद्यमान वंशज ) पंढरपूर यांचे शुभ हस्ते व मोहन शेळके, जोतिराम चांगभले, बळीराम जांभळे, भगवान बनसोडे, किरण श्रीचिप्पा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना तानाजी बेलेराव महाराज यांनी केली.सूत्रसंचालन सुधाकर इंगळे महाराज यांनी केले. यावेळी मुक्ताई प्रतिष्ठान अध्यक्ष शंकर भोसले , प्रभाकर ताटे, किशोर धायगुडे, राम मुद्दे, आदी पदाधिकारांनी परिश्रम घेतले.