मुंबई: शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कुणाला संधी मिळणार याचा सस्पेन्स आता संपला आहे. शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांचं नाव फायनल झालं आहे, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत म्हणाले की, “संभाजीराजेंचा आम्ही आदर करतो, म्हणूनच त्यांना पक्ष प्रवेशासाठी निमंत्रण दिलं. या आधी शाहू महाराजांनी शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मालोजीराजेंनी काँग्रेसमधून आणि स्वत: संभाजीराजेंनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे छत्रपतींना कोणत्याही पक्षाचं वावडं नसावं.”
संजय राऊत म्हणाले की, “संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. त्यांनी पक्षासाठी आतापर्यंत खूप काम केलं आहे. त्यामुळेच पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता फक्त त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.”