वॉटर पार्कचा शानदार उदघाटन सोहळा
सोलापूर : सोलापूरच्या पर्यटनात भरघालणारे चाकोते यांचे शॉवर अँन्ड टॉवर वॉटर पार्क परिवारासह वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. असे प्रतिपादन बॉलिवुड अभिनेते रितेश देशमुख यांनी केले. सोन्नलगी अँक्वापार्क कंपनीच्या शॉवर अँन्ड टॉवर वॉटर पार्कचे उदघाटन त्यांच्या हस्ते सोमवार दि. 9 मे रोजी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
सोलापूर सारख्या ठिकाणी वॉटर पार्कची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणून चाकोते परिवाराने सोलापूरच्या पर्यटनामध्ये भर घातली आहे. या ठिकाणच्या सोई सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. पुर्वीच्या काळात रोटी,कपडा,मकान हे जीवनावश्यक मानले जायचे परंतु आता रोटी,कपडा, मकान आणि मनोरंजन हे आवश्यक झालेले आहे. कोरोना नंतर प्रत्येकाला आपल्या मनोरंजनाची आवश्यकता भासू लागली आहे. त्यातच चाकोते परिवाराने ही सुविधा सोलापूरमध्ये करून दिली आहे. चाकोते परिवाराच्या घरात विश्व आहे आणि त्यांनी मनोरंजनाचे हे नवे विश्व निर्माण केले आहे. बँकांनी केवळ कर्ज देण्यापुरतं मर्यादीत असू नये तर कर्जदाराच्या अडचणीत आधार देण्यासाठीही पुढे आले पाहिजे आणि ते काम भारतीय स्टेट बँकेने केले आहे.
शॉवर अँन्ड टॉवर हे मॉडेल वॉटर पार्क व्हावे. विश्वशंकर आणि विश्वराज या दोघा चाकोते बंधुनी वॉटर पार्कचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करावे. नव्या पिढीतील तरूणांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे.असेही रितेश देशमुख यांनी सांगितले.
प्रारंभी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी सर्वांचे स्वागत करीत आपल्या भाषणातून त्यांनी माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांच्या आठवणी सांगितल्या. महापौर असताना सोलापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी सुशीलकुमार शिंदे साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांनी कशी मदत केली. या दोघांचा सत्कार करताना दो हंसो का जोडा हे बिरूद त्यांना कसे लावले. आणि ते पुढे लोकप्रिय झाले. विलासराव यांचेच रूप रितेश देशमुख यांच्यामध्ये दिसून येत आहे आणि त्यांनी विलासराव प्रमाणेच सोलापूरवर प्रेम करावे असेही विश्वनाथ चाकोते यांनी सांगितले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठ्या हिमतीने विश्वराज चाकोते या छोट्या भावासोबत विचार करून सोलापूरसाठी नवीन काहीतरी करायचे असे ठरवून शॉवर अँन्ड टॉवर हे वॉटर पार्क सुरू केले. अनेक अडचणी आल्या त्यावर मात करून यशस्वीपणे हा प्रकल्प पूर्ण केला आहे.बाबुराव आप्पा चाकोते आणि विलासराव देशमुख यांचे संस्कार आमच्यावर चांगल्या प्रकारे झाले त्यामुळेच आज आम्ही यशस्वीपणे काम करत आहोत. पुढे भविष्यात आणखी नवनवीन उपक्रम सुरू करणार असल्याचे आपल्या प्रास्ताविकातून विश्वशंकर चाकोते यांनी सांगितले. युवक बिरादरीचे काम करीत असताना रितेश देशमुख यांच्याशी संपर्क आला. त्यांचा परिवार आणि चाकोते परिवार यांचे अनेक वर्षापासून घरगुती संबध आहेत. असेही ते म्हणाले.
शॉवर अँन्ड टॉवर वॉटर पार्क हे लोकांच्या मनोरंजनासाठी चांगला खजिना चाकोते परिवाराने दिला आहे त्यातून आनंद मिळणार आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या भाषणातून केले.
भारतीय स्टेट बँक केवळ घर, गाडी, व्यवसायासाठी कर्ज देत नाहीतर मनोरंजनासाठीही कर्ज पुरवठा करते. आणि चाकोते परिवाराच्या शॉवर अँन्ड टॉवर वॉटर पार्कसाठी कर्ज देवून बँकेने जो विश्वास दाखवला होता तो सार्थ ठरल्याचे दिसून येत आहे असे भारतीय स्टेट बँकेचे पुणे विभागीय व्यवस्थापक महेश्वर प्रसाद यांनी सांगितले.
चाकोते परिवाराने सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचा हा चांगला उपक्रम सुरू केला असल्याचे बार्शी शिवसेनेचे प्रमुख आंधळकर यांनी व्यक्त केले.
प्रारंभी फित कापून आकाशात फुगे सोडून शॉवर अँन्ड टॉवर वॉटर पार्कचे उदघाटन अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते झाले. नंतर दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, प्रिसिजनचे यतीन शहा, सुवासिनी शहा, वळसंग सूत मिलचे राजशेखर शिवदारे, माजी नगरसेवक अमोल बापु शिंदे, सुप्रिता चाकोते, सुदीप चाकोते, सकलेश चाकोते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले तर आभार विश्वराज चाकोते यांनी व्यक्त केले.
चाकोतेंच्या घरचा डबा…
पुर्वी लातूरहून मुंबईला जाण्यासाठी सोलापूरला यावे लागत होते. सोलापूर हे महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. साहेब आणि आम्ही कधीही सोलापूरला रेल्वेस्टेशनवर आल्यानंतर चाकोते यांच्या घरातून डबा यायचा तो खाल्यानंतर आम्ही पुढे मुंबईला जात होतो अशी आठवण रितेश देशमुख यांनी सांगितली.
शिवरंजनीचे कौतुक
उदघाटन कार्यक्रमादरम्यान शिवरंजनीच्या कलावंतानी आपली कला सादर केली त्यामुळे प्रभावित होवून रितेश देशमुख यांनी भाषणाची सुरूवात करण्यापुर्वी शिवरंजनी वाद्यवृंद कलावंताचे विशेष कौतुक केले.