‘सोविम’स दिले आश्वासन
सोलापूर: सोलापुरातील सुसज्ज अशा होटगी रोड विमानतळावरून सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा अडसर दूर करून त्वरित नागरी विमानसेवा सुरु करण्याबाबत आज ‘सोविम’तर्फे खासदार डॉ. श्री जयसिद्धेश्वर महास्वामी यांची भेट घेण्यात आली. सोलापुरात विमानसेवा नसल्यामुळे टॉवेल, चादर ,रेडिमेड उद्योग, मेडिकल टुरिझम व सिद्धेश्वर व जवळील इतर आध्यात्मिक पर्यटन झपाट्याने मागे पडत आहे. नवीन उद्योगधंदे येत नसल्यामुळे सोलापूरचे नागरिक दुसऱ्या शहरात स्थलांतर करीत आहेत ही बाब सोलापूर सारख्या एकेकाळी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘मंचेस्टर ऑफ ईस्ट’ म्हणून घेणाऱ्या शहरास अत्यंत लाजिरवाणी आहे.ही गोष्ट आज खासदारांना सोलापूर मंच तर्फे पुराव्यासहित पटवून देण्यात आली व ती त्यांनी आपली सुद्धा खंत आहे असे बोलून दाखविले.
सोलापूरचे नावलौकिक जगभर होण्यासाठी सोलापूरातील विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी त्यांच्या परिने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, देशविदेशात सोलापूरच्या बुद्धीमान तरुणांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर उच्चपद मिळवुन सोलापूरचे नावलौकिक केले आहे. आता वेळ आली आहे सोलापूरच्या बुद्धीमान तरुणांसाठी सोलापूरातच रोजगार निर्मितीसह नवे उद्योगिक प्रकल्प येण्याकरिता सोलापूरात विमानसेवा त्वरित सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत असे सोलापूरचे खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांची सोलापूर विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यां समवेतच्या बैठकीत विचार व्यक्त केले.
सोलापूरच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी होटगीरोड विमानसेवे संदर्भात खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या समवेत बैठक घेतली. सोलापूरच्या विकासाशी निगडित विविध विषयांवर चर्चा झाली, प्रामुख्याने विमानसेवेस अडथळा असलेली श्री सिद्धेश्वर सह.साखर कारखान्याच्या अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी संदर्भात सोलापूरच्या जनतेमध्ये असलेल्या गैरसमजाविषयी व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचा निर्वाळा बैठकीत निघाला. केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजने अंतर्गत सोलापूरच्या विमानसेवेसाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता होटगी रोड येथील विमानतळाने केली असुन एअरपोर्ट एथोरीटी अॉफ इंडियाच्या देखरेखीखाली सदर विमानतळ सर्वसोयींनीयुक्त अद्ययावत करण्यात आले आहे. परंतु जोपर्यंत शेजारील सिद्धेश्वर कारखान्याची अनधिकृत चिमणी हटवली जाणार नाही तोपर्यंत डीजीसीए नागरी विमानसेवेसाठी छोट्या अथवा मोठ्या कोणत्याही विमान सेवेस परवानगी देणार नाही ही गोष्ट सोविम तर्फे खासदारांना सांगण्यात आली. तसेच बोरामणी विमानतळ वनखात्याने माळढोक आरक्षित ३४ हेक्टर जागा देण्यास नकार दिल्याने कदापिही नजीकच्या काळात होऊ शकणार नाही.सोलापूरकरांना विमानसेवेचा लाभ त्वरित व्हावा, ह्या दृष्टीने सोलापूर होटगी रोड विमानतळ सुरू करण्याबाबत जलद कार्यवाही करावी अश्या मागणीचे निवेदन सोलापूरकरांच्या वतीने खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांना दिले.
सोलापूरातील नामांकित संस्था आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी होटगी रोड विमानसेवा जलदगतीने सुरु होण्याकरिता जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्या समवेत सतत पाठपुरावा केला असुन, सर्व अधिकार्यांनी श्री सिद्धेश्वर सह.साखर कारखान्याच्या अनाधिकृत चिमणी पाडकामाविषयी सकारात्मकता दर्शविली आहे. खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामींनी त्वरित जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना विमानतळ सुरू करण्याबाबत हालचाली सुरु करून त्याचा अहवाल कळवण्यास फोन करून सांगितले व गरज पडली तर ही बाब केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत मी पोहोचवून त्वरित सोलापूरचे होटगी रोड विमानतळ सुरु करण्यास तत्पर आहे असे आजच्या बैठकीत सांगितले.