मुंबई : जिओ 5G ची घोषणा केल्यानंतर आता मुकेश अंबानी लवकरच जिओचा आयपीओ आणण्याच्या तयारीत असल्याची बातमी एका अहवालानुसार हाती आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्ससाठी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग अर्थात आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. कंपनीच्या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत उद्योगपती मुकेश अंबानी याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अंबानींच्या योजनेत त्यांची दूरसंचार फर्म रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म आणि RIL उपकंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडसाठी स्वतंत्र आयपीओ समाविष्ट आहेत. हिंदू बिझनेस लाइनच्या अहवालानुसार, या दोन्ही कंपन्यांच्या आयपीओच्या माध्यमातून अंबानी प्रत्येकी 50,000 कोटी ते 75,000 कोटी रुपयांची मोठी रक्कम उभारण्याचा विचार करतील.