येस न्युज नेटवर्क : रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले असून अपेक्षेनुसार व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल न करता तो 4 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. तर, रिर्व्हस रेपो रेट 3.75 टक्के इतका करण्यात आला आहे. सलग 11 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, भू-राजकीय संघर्षाचा परिणाम अनेक अर्थव्यवस्थांवर होत आहे. भारतासाठीदेखील हा आव्हानात्मक काळ आहे. देशात महागाई दर वाढण्याचाही अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा मान्सून सरासरी राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बाजारातील घडामोडी पाहून धोरणात बदल करण्यात येईल असेही दास यांनी सांगितले.