उपायुक्त धनराज पांडे यांनी घरी जाऊन केले सन्मानित
सोलापूर : राज्य शासनाने दिलेल्या निर्दशाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाकरिता ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना सोलापूरचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी मारुती चितमपल्ली यांना बुधवारी घरी जाऊन ब्रँड अँबेसिडर म्हणून सन्मानित केले
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सोलापुरात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांना दिली. अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा उपायुक्त धनराज पांडे यांनी यावेळी व्यक्त केली.
पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तसेच पर्यावरणप्रेमींना कायम मार्गदर्शन लाभत राहील, असे अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांनी यावेळी सांगितले. येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या वतीने रोपनिर्मिती करण्यासाठी प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी ब्रँड अँबेसेडर चित्रकार सचिन खरात, सोलापूर महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलनकर, पर्यावरणप्रेमी परशुराम कोकणे उपस्थित होते.