सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीवर उत्तर सोलापूर तालुक्यातून कारंबा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. कौशल्या विनायक सुतार यांची सरपंच प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. जिल्हा परिषदेचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्याचे काम ही समिती करणार आहे.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) ईशादीन शेळकंदे यांनी या निवडीचे पत्र सौ. सुतार यांना पाठवले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे दोन सदस्य, पंचायत समितीचे सर्व सभापती आणि प्रत्येक तालुक्यातून एक सरपंच आणि अन्य काही प्रमुख विभागाचे अधिकारी अशी ही समिती आहे. त्यात उत्तर सोलापुरातून सरपंच प्रतिनिधी म्हणून सौ. सुतार यांची एकमेव निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या विकास कामांचा प्रारुप आराखडा ही समिती तयार करणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.