येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये कोणत्याही खताची कमतरता भासणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. खत दुकानदार किंवा वितरकांनी शेतकऱ्यांना नियमित खताबरोबर अन्य औषधे, इतर मालांची सक्ती केल्यास कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह विविध खत कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शंभरकर यांनी सांगितले की, खताबरोबर इतर औषधांची सक्ती केली जात असल्याची जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खत दुकानदारांविरूद्ध तक्रारी आहेत. तसेच शासनाच्या दराप्रमाणे खताची विक्री होत नसल्याच्याही तक्रारी आहेत. जुन्या दराचे खत त्याच दराने विकायला हवे, अशा तक्रारी आल्या तर संबंधित दुकानदार यांचा खत दुकानाचा परवाना रद्द केला जाईल, शिवाय गुन्हे दाखल केले जातील.
येणाऱ्या खरीप हंगामासाठी युरिया कमी पडणार नाही, याची दक्षता आतापासूनच घ्या. आगावू मागणी नोंदवून खते कमी पडणार नाहीत, याचे नियोजन करा. वितरण व्यवस्था सुधारा, खतांच्या पुरवठा, दर्जा आणि किंमतीवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.प्रत्येक खत कंपनीकडून जिल्ह्यासाठी किती साठा येणार आहे, कोणत्या वितरकाला किती देणार आहे, याची आगावू माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी. ई-पॉश मशिनवर साठा आहे, मात्र तो गोडावूनमध्ये नसतो. असे होता कामा नये. आपल्या जिल्ह्यातील खतांचा साठा इतर राज्यात, जिल्ह्यात जाणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिंदे यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात खतांचा साठा कमी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना जैविक खते वापरण्यासाठी जागृती करा. खरिपाचे क्षेत्रही वाढले असल्याने फेब्रुवारी, मार्चची मागणीही जास्त नोंदवा.