येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय तिरंगा आपल्या दोन्ही बाजूस मोठ्या डौलाने फडकत असतो. आसमंतदेखील क्षणभर या ध्वजलहरीने स्तब्ध होतो. नजरेच्या टप्प्यात जिकडे पहावे तिकडे तिरंगाच. डोळेसुध्दा हे दृश्य पाहुन दिपून जातात आणि तिरंग्यास सलामी देत आनंदात वाहतात. देशभक्तीपर गीत, संगीत अशा मंत्रमुग्ध वातावरणाने कान तृप्त होतात. ओठी आलेले शब्द देखील स्तब्ध होतात. श्वासाश्वासातून राष्ट्रप्रेमाचा ध्यास आपल्या हृदयाची स्पंदन होतात आणि मन तिरंग्या सोबत मोठ्या आनंदाने हिंदोळा घेते.
होय ! अगदी असेच होते. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्लीतील राजपथ येथील संचलनाच्यावेळी संचलन करणाऱ्या प्रत्येकाची अन् ते पाहणाऱ्या करोडो भारतीयांची हीच अवस्था होते. राजपथावरील त्या संचलनातून राष्ट्रभक्तीची एक उच्चतम अनुभती मिळते.
नवी दिल्ली येथील राजपथवर हे संचलन दरवर्षी केले जाते. भारतीय लष्कराची ताकद आणि भारतीय एकात्मतेचे यथार्थ दर्शन संपूर्ण जगाला या निमित्ताने घडविले जाते. अगदी जगभरातून पर्यटक या सोहळ्यासाठी येतात. तसेच दरवर्षी एखाद्या विदेशी पाहुण्याला विशेष निमंत्रित केले जाते. कोरोनाच्या संकटामुळे यावर्षीं विशेष आमंत्रित नाहीत.
1955 पासून या प्रजासत्ताक दिवस परेडला सुरुवात झाली. भारतीय लष्कराचे आर्मी, नेव्ही व एअरफोर्सचे तसेच विविध रेजीमेंट्सचे जवान, पोलीस दल, राष्ट्रीय छात्र सेना (NCC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), स्काऊट गार्ड, RSP, चे विद्यार्थी यांचे पथक संचलन करतात. तसेच मा. राष्ट्रपतींचे घोडस्वार सुरक्षा पथक, ऊंटस्वाराचे पथक देखील यात सहभागी असते. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट अमर जवान ज्योतीपर्यंत असलेल्या राजपथाच्या दोन्ही बाजुने प्रेक्षकांसाठी जागा असते. विविध राज्यातील वैशिष्ट्य दर्शविणारे चित्ररथ तसेच निर्भय मिसाईल, अश्विन रडार सिस्टिम देखील या संचलनात असतात.
यावेळी वायुदलाच्या आकर्षक व चित्तथरारक कवायती होतात. मोटारसायकलस्वार जवान कसरती करतात. 21 तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीत सादर केले जाते. सेनादलाची सर्वोच्च पदक देऊन वीरांचा, शहिदांच्या कुटुंबाचा सन्मानाही केला जातो. हेलीकॉप्टरव्दारे पुष्पवृष्टी होते. एकूणच संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या धुक्याने आच्छादलेले असते.
प्रजासत्ताकदिनी राजपथावर विविध चित्ररथ पथसंचलनात सहभागी होतात यात केंद्रीय मंत्रालयांसह विविध राज्यांचे चित्ररथ सहभागी असतात. यावर्षी आपल्या राज्याचा ‘जैवविविधता मानके’ चित्ररथ आहे.
प्रजासत्ताक दिन परेड आपल्या राज्यातही होते. शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे याचे आयोजन केले जाते. अगदी दिल्लीच्या संचलनाच्या धर्तीवर येथील आयोजन असते. मा.राज्यपाल महोदयांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण होऊन संचलन सुरु होते. या संचलनात संरक्षण दल, पोलीस, होमगार्ड, विद्यार्थी यांच्यासह विविध विभागांची पथकं आणि चित्ररथ सहभागी असतात. .
कठोर परिश्रम
नवी दिल्ली येथील 1991 च्या प्रजासत्ताक परेडमध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. त्याठिकाणी जवळपास 25 दिवस या संचलनाची तयारी करुन घेतली जाते. विविध दलांचे कॅम्प सुरु होतात. या परेडसाठी ज्याची निवड होते तो खरोखरच भाग्यवान असतो, कारण कठोर परिश्रमाने विविध कसोट्या पार करत या जागी पोहोचलेला असतो. यातील प्रत्येकाच्या मनात, आयुष्यात एकदा तरी प्रजासत्ताक दिन परेडची संधी मिळावी हीच भावना असते किंबहुना त्याचे ते स्वप्नही असते आणि या स्वप्नपूर्तीसाठी कित्येक दिवस, वर्ष मेहनत घेतो आणि त्याच्या या स्वप्नपूर्तीचा हा क्षण येतो. संरक्षण दलात सेवा करताना ही संधी मिळू शकते. पण विद्यार्थीदशेत ही संधी मिळणे हेही भाग्यच असते. आपला देश आपल्यासाठी काय करतो ? असा प्रश्न विचारण्यापेक्षा, आपण देशासाठी काय करु शकतो असा प्रश्न युवा वर्गाने विचारला पाहिजे आणि मग त्याचे उत्तर संरक्षण दलातील या युवा वर्गाकडे पाहिले की मिळते. निश्चितच अभिमान आणि राष्ट्रभक्ती याचे जाज्वल्य प्रतिक असलेले हे प्रजासत्ताक दिन संचलन आहे. मी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्याने स्वानुभावाने हे ठामपणे सांगु शकतो की, राजपथ येथील प्रजासत्ताक दिन संचलन म्हणजे राष्ट्रभक्तीची उच्चतम अनुभूती आहे.
स्वानुभव
राष्ट्रीय सेवा योजनेच्या म्हणजे एनएसएसच्या पथकामार्फत महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून मी सहभागी होतो. राज्याच्या विविध विद्यापीठांमधून एक विद्यार्थी व एक विद्यार्थिंनी अशी निवड त्यावेळी केली होती. देशातील विविध विद्यापीठाचे एन.एस.एस.चे प्रतिनिधी या कॅम्पमध्ये होते. आमच्या निवास तंबूमध्ये एकाच राज्याचे विद्यार्थी न ठेवता सरमिसळ करुन बारा-बारा विद्यार्थ्यांच्या समुहाला एकत्र ठेवले होते आणि यातूनच राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक भक्कम झाली. तो तंबू म्हणजे एक घर आणि त्यातील आम्ही विद्यार्थी म्हणजे एक कुटुंब असाच संदेश सर्वच कॅम्पमधून दिला जातो.
असो, त्यावेळी या कॅम्पमध्ये जे माझे सहकारी होते, ते आजही 30 वर्षांनी देखील 26 जानेवारी आली की कळत नकळत RD परेड कॅम्प मध्ये रमतात.
सन 1991च्या परेडमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्रातील जे सहकारी आहेत. त्या सहकाऱ्यात उषा शर्मा-वर्मा स्टेट एक्साईजची संचालक, डॉ.विवेकानंद रणखांबे,भारती विद्यापीठात प्राध्यापक, सुभाष खरबस, पत्रकार-शिक्षक होता. किशोर राऊत, बॅंक अधिकारी, शैलेश अभिषेकी व मेधा गोव्यात बिझिनेस सांभाळत आहेत.पवई पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील, डॉ. साधना केसकर नागपूरला निनाद म्युझिक अकादमी चालवते. गोव्यातून सहभागी झालेली कल्पना आता वलसाडला शिक्षिका आहे.वृंदा पंडित पुणे भावे प्राथमिक शाळा कर्णबधिर मुलांना शिकवते. तर सुचिता, विजय, सुहास आनंद बिझनेस करतात. ऑस्विन लंडनला पंचतारांकीत हॉटेलमध्ये शेफ आहे. जाफर यवतमाळला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आहे. धनराज आदे आदर्श शेतकरी तर भावना जवाहर नवोदय विद्यालय दक्षिण गोवा येथे मराठी अध्यापिका म्हणून कार्यरत आहे. संगीता श्रीराव नागपूर जिल्हा परिषद ला शिक्षिका आहे. मी स्वत: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क मध्ये उपसंचालक (पुणे) म्हणून काम करतो. आम्ही हमखास 26 जानेवारीला कॅम्पची व परेडची आठवण काढतो व 32 वर्षानंतरही ती अनुभूती घेतो.