येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्रात गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. राज्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. परिणामी हवेत गारवा राहिल्याने तापमानात घट झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. धुळे जिल्ह्यात 4.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर, नंदुरबारसह नाशिकच्या निफाडमध्येही पारा पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला.
सातारा जिल्ह्यातील तापमानात घट झाली आहे. वेण्णालेक परिसरात 4.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये पारा 6.5 अंशावर पोहोचला आहे. वाईमध्ये 9 अंश तर, साताऱ्यामध्ये 11.3 अशं तापमान आहे. नाशिकच्या निफाडमध्येही पारा पाच अंश सेल्सिअसपर्यंत येऊन पोहोचल्याने बळीराजा समोर मोठं संकट उभं राहीलं आहे. या कडाक्याच्या थंडीचा द्राक्षांवर मोठा परिणाम होणार असून मणीना तडे जाण्यासोबतच फुगवणी थांबणार आहे. या बागा वाचविण्यासाठी बळीराजा भल्या पहाटेपासून बागांमध्ये गवत जाळत शेकोटी करून मणींना ऊब देत आहेत. तर, पुण्यामध्येही 9.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्ह्याचे तापमानही घसरले आहे. परभणी जिल्ह्याचे तापमान 8.6 अंशावर असून सर्वत्र थंडीचा कडाका वाढल्याचं चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये पारा पाच अंश सेल्सिअसच्या खाली नोंद झाली आहे. सपाटी भागात तापमान 8.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. दुर्गम डोंगराळ भागात सपाटी भागापेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअस पेक्षा तापमान कमी असते. वाढत्या थंडीसह प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. पश्चिमी चक्रवातामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील तापमानात घट होईल असं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.