सोलापूर : प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ बुधवार दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस आयुक्त मुख्यालय येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
या दिवशी सकाळी 8.30 ते 10.00 वाजेच्या दरम्यान इतर कोणत्याही शासकीय अगर निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.30 वाजेच्या पूर्वी किंवा 10.00 वाजेनंतर आयोजित करावा. दि. 26 जानेवारी 2022 रोजी सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतींवर, ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.
वृक्षारोपण, सामुदायिक देशभक्तीपर गीतगायन, वाद विवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन शाळा व महाविद्यालयांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करावे.
कोरोना विषाणूमुळे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक अंतर ठेऊन याबाबतच्या सर्व नियमांचे पालन करावे. तसेच प्रत्येकाने मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. नागरिकांना प्रजासत्ताक दिनाचा समारंभ स्थानिक चॅनेलद्वारे घरी बसून पाहता येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.