सोलापूर: शिवयोगी सिध्दरामेश्वर हे महात्मा बसवेश्वरांच्या समकालीन शरण आहेत. कल्याणपर्वातील शरणांमध्ये सर्वाधिक वचने सिध्दरामेश्वरांची उपलब्द आहेत. परंतु हे साहित्य कन्नडमध्ये असल्याने मराठीमध्ये त्यांच्या चरित्राचा व्यापक अभ्यास होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन श्री.सिध्देश्वर मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले. येथील विश्वस्त समितीच्या कार्यालयात शरण साहित्य अध्यासनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या शरण गाथा- बसव दिनदर्शिकेचे प्रकाशन मंगळवारी काडादी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी शरण साहित्य अध्यासनचे विश्वस्त आणि शरण गाथा दिनदर्शिकेचे संपादक चन्नवीर भद्रेश्वरमठ, शिवराया तेली, धनराज मैंदर्गी, उज्ज्वलकुमार माने, मंदिर समितीचे विश्वस्त अॅड. मिलिंद थोबडे, सुभाष मुनाळे, भिमाशंकर पटणे, निलकंठ कोनापुरे, राजशेखर येळीकर, बाळासाहेब भोगडे, सिध्देश्वर प्रशालेचे मुख्याद्यापक संतोष पाटील यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सिध्दरामेश्वरांच्या चरित्रातील सुमारे 12 वर्षे तुमकूरू आणि परिसरात गेल्याचे अनेक उल्लेख आढळतात. त्याच प्रमाणे दक्षिण भारतात शेकडो सिध्दरामेश्वरांची मंदिरं आहेत. मात्र त्यांच्या चरित्रात हा संदर्भ फारसा आलेले दिसत नाही. या पार्श्वभूमिवर आगामी काळात जगदगुरूंसह अभ्यासकांनी एकत्र येऊन संशोधन करणे आवश्यक आहे. या साठी मंदिर समितीचे सहकार्य राहील, अशी ग्वाही देतांनाच महात्मा बसवेश्वर, सिध्दरामेश्वर आणि शरणांच्या चरित्राच्या अभ्यास करणार्या शरण साहित्य अध्यासनाचे प्रयत्न अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन धर्मराज काडादी यांनी केलेे. बसववाणी या युटूब चॅनलवरील शरणांच्या चरित्राची व्याख्यानं महत्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी शरण साहित्य अध्यासनचे विश्वस्त आणि शरण गाथा-बसव दिनदर्शिकेचे संपादक चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी भूमिका मांडली. महात्मा बसवण्णा आणि शिवयोगी सिध्दरामेश्वर हे कल्याणपर्वाचे नायक आहेत. त्यांचे साहित्य कन्नडमध्ये असल्याने मराठी अभ्यासकांना आणि सर्वसामान्य वाचनकांसमोर अडचणी आहेत. त्यामुळे शरण साहित्य अध्यासन शरणांच्या वचनांचा आणि चरित्रांचा मराठीत अभ्यास करणारी विश्वस्त संस्था म्हणून काम करण्याचे व्रत स्विकारले आहे. बसववाणी हे युटूब चॅनल ही संस्था चालवते. या दिनदर्शितेत शरणांच्या जयंती पुण्यस्मरणासह नव्या पिढीला आठवण रहावी म्हणून सोलापूरच्या जडण घडणीत योगदान दिलेल्या समाज धुरीणांचाही समावेश करण्यात आल्याचे भद्रेश्वरमठ यांनी सांगितले.
शरण गाथा- बसव दिनदर्शिकेचे प्रकाशन श्री.सिध्देश्वर मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते मंदिर समितीच्या कार्यालयात झाले. यावेळी सिध्देश्वर बमणी, उज्ज्वलकुमार माने, निलकंठ कोनापुरे, दिनदर्शिकेचे संपादक चन्नवीर भद्रेश्वरमठ, धनराज मैंदर्गी, शिवराया तेली, अॅड.मिलिंद थोबडे आदी.