येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यामध्ये परीक्षेचे नवनवीन घोटाळे दररोज उघड होऊ लागले आहेत. आरोग्य विभागाचा घोटाळा राज्यभर गाजत असतानाच महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या अर्थात म्हाडाच्या भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण उजेडात आले. तोपर्यंतच आता राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी गैरव्यवहार उघड झाला आहे. म्हाडा पेपर फुटी तील मुख्य सूत्रधार असलेला जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा संचालक डॉक्टर प्रतिश देशमुख यांच्यासह अटकेत असलेले त्यांचे साथीदार संतोष हरळकर, अंकुश हरळकर यांनी एजंटांमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे अभिषेक सावरीकर यांच्याबरोबर संगनमत करून गैरव्यवहार केल्याचे उजेडात आले. म्हाडा पेपर फुटी प्रकरण उघड झाल्यामुळेच टीईटी परीक्षेतील धागेदोरे उघड झाले आहेत. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागात खाजगी कंपनीचा तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत असणारा अभिषेक सावरीकर यांच्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .या दोघांना अटक केली आहे. त्यांना 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला .अभिषेक सावरीकर हा सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त तथा आयएएस ऑफीसर अजय सावरीकर यांचे चिरंजीव आहेत. सलग तीन परीक्षांमध्ये घोटाळे उघड झाल्यामुळे राज्य शासनाच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहे.