नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना यूपीएत जाणार या चर्चा मीडियामध्ये आहेत. आमच्यात या चर्चा झाल्या नाहीत. आम्ही त्या वृत्तपत्रातून वाचतो आणि माध्यमातून पाहतो, असं म्हटलं. राहुल गांधी यांना भेटणार आहे तो आमचा संवाद असतो. काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आहे. तिन्ही पक्षात संवाद असावा म्हणून राहुल गांधी दिल्लीत असले तर त्यांच्याशी भेटून चर्चा करतो. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोग हा मिनी यूपीए असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर, दुसरीकडे संजय राऊत आज राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक दुपारी दिल्लीत तीन वाजता होणार आहे.
शिवसेना गोव्यात लढणार उत्तर प्रदेशमध्ये चाचपणी सुरु
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, देशातील वातावरण यासंदर्भात चर्चा होते. पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी शिवसेना गोव्यात निवडणूक लढवणार आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी सुरु आहे, असं संजय राऊत म्हणाले.