मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने 372 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने 325 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या न्यूजीलंच्या संघाला भारताने अवघ्या 62 धावांत रोखलं. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात भारताच्या फलंदाजांनी 7 बाद 276 धावांवर डाव घोषित केली. आणि न्यूझीलंडला 540 धावांचं आव्हान दिलं. मात्र हे आव्हान न्यूझीलंडच्या संघाला पेलवलं नाही. न्यूझीलंडच्या संघ दुसऱ्या डावात 167 धावांमध्ये ऑल आऊट झाला. त्यामुळे भारताने मुंबई कसोटी 372 धावांनी शानदार विजय मिळवला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसऱ्या दिवशी भारताने सामना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवला होता. 540 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने काल दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारली होती. विजयासाठी न्यूझीलंडला दोन दिवसात 400 धावांची आवश्यकता होती. तर भारताला पाच विकेट्सची गरज होती. मात्र किवी संघ आजच्या दिवसात 27 धावा जोडू शकला. अवघ्या 27 धावांनी त्यांनी उर्वरित 5 फलंदाज गमावले.
झीलंडच्या दुसऱ्या डावात भारताच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने किवी कर्णधार टॉम लॅथमला (6) स्वस्तात बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर अश्विनने विल यंग (20) आणि रॉस टेलर (6) यांनाही पव्हेलियनचा रस्ता दाखवत न्यूझलंडला संकटात टाकलं. त्यानंतर डॅरिल मिचेलने फटकेबाजी करत झुंज दिली, मात्र तोदेखील 60 धावा करुन अक्षर पटेलची शिकार ठरला. त्यानंतर आलेला यष्टीरक्षक टॉम ब्लंडेल खातेही न उघडता धावबाद झाला. 129 धावांत न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला. मात्र टॉम ब्लंडेल बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज हेन्री निकोल्स (36) आणि रचिन रवींद्र (2) या दोघांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. दोघांनी 8 षटकं खेळू काढली. त्यामुळे न्यूझीलंडने दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारली.
हेन्री निकोल्स आणि रवींद्र आजच्या दिवसात भारतीय गोलंदाजांचा फार प्रतीकार करु शकले नाहीत. सकाळच्या सत्रात जयंत यादवने रचिनला पुजाराकरवी झेलबाद केलं. त्यानंतर काईल जेमिसनलादेखील त्याने पायचित करत माघारी धाडलं. पाठोपाठ टिम साऊथीलादेखील जयंतने त्रिफळाचित केलं. दोघेही खातंदेखील उघडू शकले नाहीत. अखेर हेन्री निकोल्स याला रवींचंद्रन अश्विनने बाद केलं. निकोल्स यांनी 44 धावांचं योगदान देत बराच वेळ संघर्ष केला. भारताकडून या डावात रवीचंद्रन अश्विन आणि जयंत यादव या दोघांनी प्रत्येकी चार बळी घेतले. तर अक्षर पटेलला एक विकेट घेता आली.
न्यूझीलंड 65 वर्षांपासून मालिका विजयाच्या प्रतीक्षेत
1956 पासून न्यूझीलंडचा हा 12 वा भारत दौरा होता. या दौऱ्यासह, उभय संघांमध्ये भारतात 37 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये किवी संघ केवळ दोन कसोटी जिंकू शकला आहे, तर 15 कसोटी सामने गमावले आहेत. यावरून न्यूझीलंडचा भारतातील रेकॉर्ड किती वाईट आहे हे स्पष्ट होते. न्यूझीलंडने 1988 मध्ये टीम इंडियाचा अखेरचा पराभव केला होता. न्यूझीलंडने भारतात कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. गेल्या 65 वर्षांपासूनची ही न्यूझीलंडविरोधातील विजयांची मालिका यंदादेखील कायम राखण्यात भारतीय संघाला यश आलं आहे.