सोलापूर : छाया-प्रकाश फाऊंडेशनच्या शिष्यवृत्ती आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचे हे तिसरे वर्ष. दि..०९ ऑक्टोबर,२०१९ रोजी प्रथम सोहळा, हुतात्मा मंदिरात साजरा झाला होता. कोविडच्या जागतिक संकटामुळे २०२० ला तो ऑनलाईन पद्धतीने साजरा झाला.
‘छायाताई व प्रकाशजी’ यांच्या नावाचा ट्रस्ट, त्यांचे ज्येष्ठ पुत्र अजित प्रकाश शहा (दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती) व शहा परिवारातील इतर सदस्य यांनी मिळून दिल्लीत स्थापन केलेला आहे. छायाताई या सोलापूरच्याच असून रावसाहेब निम्बर्गीकर यांच्या कन्या होत. स्वत: प्रकाश शिवलाल शहा यांनी सोलापुरात दीर्घकाळ वकिली केली आणि ते मुंबई येथे काही काळ उच्चन्यायालयाचे न्यायमूर्ती होते. सोलापूरशी शहा घराण्याची खूप जवळीक आहे. ते ऋणानुबंध दृढ राहावेत ही त्यांची इच्छा, म्हणून सोलापुरच्या शैक्षणिक विकासाला हातभार लावावा हे या ट्रस्टचे उद्दिष्ट आहे. सोलापूर जिल्ह्यातील खूप हुशार आणि गरजू अशा विद्यार्थी – विद्यार्थिनीना या ट्रस्टतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते.
त्यासाठी जात-धर्म-पंथ ही कोणतीच अट नसते. बारावीनंतर इंजिनीरिंग, मेडिकल, संशोधन अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. एकूण सात लाख रुपयापर्यंत हा खर्च केला जातो. पदवीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती सातत्याने देण्यात येते. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील उपक्रमशील अशा एका शिक्षकास आणि एका शिक्षिकेस प्रत्येकी ५० हजार रुपयांचा ‘शिक्षक गौरव” पुरस्कार दिला जातो.
3 आणि समाजकार्य, साहित्य, व्यवसाय अशा क्षेत्रांमध्ये दीर्घकाल, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस ‘अभिवंदन’ हा पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी चतुरस्त्र लेखक श्री.अच्युत गोडबोले यांना ‘अभिवंदन’ पुरस्कार देण्यात येणार आहे. शिवाय कलेतील योगदानाबद्दल श्रेष्ठ अभिनेते, अमोल पालेकर यांना ‘कलाकौस्तुभ’ व समर्थ पत्रकारितेसाठी दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना ‘सव्यासाची पत्रकार’ असे दोन पुरस्कार नव्याने देण्यात यणार आहेत. प्रत्येकी एक लाख रुपये व मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप असेल.