येस न्युज मराठी नेटवर्क : आधीच कोरोना संकट आणि इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एक डिसेंबरपासून कमर्शिअल सिलिंडरच्या दरात तब्बल 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात ऐन दिवाळीत कमर्शिअल सिलेंडरच्या दरात 266 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. म्हणजेच दोन महिन्याच्या आत कमर्शिअल गॅसच्या किंमतीमध्ये 366 रुपयांची वाढ झाली आहे. लासादायक बाब म्हणजे, घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला इंधन कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. या आढाव्यात एलपीजी सिलिंडरचे दर कमी करावे की त्यात वाढ करावी याबाबत निर्णय घेतला जातो. बैठकीनंतर प्रत्येक कंपनीकडून दर महिन्याच्या एक तारखेला व्यावसायिक आणि एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर केले जातात. काही वेळेस दर कायम ठेवले जातात. मात्र, वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कमर्शिअल सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तर विनाअनुदानित सिलेंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.