श्री गुरुग्रंथ साहिबजीची पालखी मिरवणूक : सोलापूर सिंधी सेंट्रल पंचायततर्फे आयोजन
सोलापूर : शीख पंथाचे संस्थापक व पहिले गुरू श्री गुरुनानक साहेबजी यांची जयंती धार्मीक आणि सामाजिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे. जयंतीनिमित्त गुरूवारी (ता. १८) आणि शुक्रवारी (ता. १९) गुरुनानक नगर येथे कार्यक्रम होणार असल्याची माहिती सोलापूर सिंधी सेंट्रल पंचायतचे हरिष कुकरेजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री गुरुनानक जयंतीनिमीत्त गुरुवारी (ता.१८) पहाटे ४.३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत भाई गुरूप्रीत सिंगजी उर्फ रिंकू भाईसाबजी यांचे उल्हासनगर येथे होणारे प्रवचन गुरुनानक नगर येथील गुरुनानक हॉलमध्ये थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवण्यात येणार आहे. तसेच सकाळी ७ वाजता श्री गुरुग्रंथ साहिबजीचे स्वरूप असलेल्या श्री सुखमणीसाहिबजी आणि श्री जपजी साहिबजी यांचा अखंड पाठ सुरु होणार आहे.
शुक्रवारी (ता. १९) श्री गुरुनानक जयंती दिनी पहाटे ४.३० वाजता ६.३० वाजेपर्यंत भाई गुरूप्रीत सिंगजी उर्फ रिंकू भाईसाबजी यांचे उल्हासनगर येथे होणारे प्रवचन गुरुनानक हॉलमध्ये लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. यानंतर सकाळी ६.३० वाजता अखंड पाठाची समाप्ती होणार आहे. यानंतर सकाळी ७ वाजता श्री गुरुग्रंथ साहिबजी या पवित्र ग्रंथांची पालखी मिरवणूक गुरुनानक नगर परिसरातून काढण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता गुरुनानक हॉल येथे सोलापूर सिंधी सेंट्रल पंचायत, राऊंड टेबल इंडिया आणि अश्विनी ग्रामीण रुग्णालय यांच्यातर्फे रक्तदान शिबिर, अवयव दान अर्ज भरण्याचे शिबिर, नेत्रदान अर्ज भरण्याचे शिबिर, मोफत लसीकरण तसेच आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. श्री गुरुनानक जयंतीनिमित्त शहरातील तब्बल दोन हजार गरजूंना नानकरोटी लंगर महाप्रसाद देण्यात येणार आहे, असेही कुकरेजा म्हणाले.
तसेच रात्री ९ वाजता श्री गुरुग्रंथ साहिबजी या पवित्र ग्रंथाच्या पाठाची समाप्ती होणार आहे. यानंतर लंगर महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. तर रात्री १०.३० वाजता उल्हास नगर येथील जयंतीनिमित्त होणाऱ्या किर्तन दरबाराच्या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सोलापूर सिंधी सेंट्रल पंचायततर्फे यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेस मोहन सचदेव, शंकरलाल होतवानी, राजकुमार पंजवाणी, लालचंद वाधवानी, इंदरलाल होतवानी, योगेश रावलानी, राजू धमेचा, हरेश नानकानी आदी उपस्थित होते.