पंढरपूर : आज कार्तिकी एकादशी… कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच पंढरपूर विठुरायाच्या नामघोषानं दुमदुमून निघालं आहे. विठुरायाच्या पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातले वारकरी कोंडीबा देवराम टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य यावेळी मानाचे वारकरी ठरले. कोरोनामुळे गेल्या वर्षी कार्तिकी वारी होऊ शकली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी कार्तिकी वारीचा सोहळा आज पंढरपुरात पार पडतोय. त्यामुळे वारकऱ्यांचे पाय पंढरपूरकडे वळलेत, असं असलं तरी एसटीच्या संपाचं सावट या यात्रेवर आहे आणि नेहमी एसटीनं पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची संपामुळे गैरसोय झाली आहे. तरीही मिळेल त्या वाहनानं वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पुन्हा एकदा गजबजलं आहे.