पुणे: देशाला 1947मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, असं खळबळजन विधान अभिनेत्री कंगना रणावतने केलं आहे. कंगनाच्या या विधानावर देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच अभिनेते विक्रम गोखले यांनी मात्र कंगनाच्या या विधानाचं समर्थन केलं आहे. कंगना खरी बोलली. तिच्या मताशी मी सहमत आहे. स्वातंत्र्य भिकेत मिळालं आहे, अशा शब्दात विक्रम गोखलेंकडून कंगनाचं समर्थन करण्यात आलं आहे.
पुण्यात एका कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी कंगनाच्या या विधानाचं समर्थन केलं आहे. भीक मागून स्वातंत्र्य मिळालं असं कंगना म्हणालीय. तिच्या या म्हणण्याशी मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य दिलेलं आहे बरं का, असं गोखले म्हणाले. तसेच ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना त्यावेळचे मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांनी या योद्ध्यांना वाचवलं नाही. आपल्या देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभं राहत आहेत हे माहीत असूनही त्यांना वाचवलं नाही. असेही लोक त्याकाळी आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचलं आहे मी, असंही त्यांनी सांगितलं.