सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रीच्या गोकुळ शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील ऊस बिलाच्या रकमेची पहिली उचल प्रतिटन दोन हजार रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे . कारखान्याचे चेअरमन दत्ता बलभीम शिंदे यांनी ही माहिती दिला.
गोकुळ शुगर इंडस्ट्रीजचा सातवा गळीत हंगाम नुकताच सुरू झाला आहे .आर्थिक अडचणीतून कारखाना बाहेर काढण्यात गोकुळच्या व्यवस्थापनाला यश आले आहे. मोळी पूजनाच्या कार्यक्रमात यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम दर पंधरवड्याला नियमितपणे बँक खात्यामध्ये जमा करण्याची हमी चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली होती. त्याच शब्दाला जागून बुधवारी गेल्या पंधरा दिवसात ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिली उचल प्रति टन दोन हजार रुपये प्रमाणे जमा करण्यात आली आहे.
कारखान्याचा यंदाच्य गळीत हंगाम
सुरळीतपणे सुरू झाला असून तोडणी आणि वाहतूक यंत्रणा सक्षम पणे कामाला लागली आहे. प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात कारखाना यशस्वी ठरला आहे. पहिल्या दिवसापासून पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू करण्यासाठी कारखान्याचे संचालक मंडळ आणि अधिकारी कामाला लागले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांचाही कारखान्याला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याची माहिती कारखान्याचे एक्झिक्युटिव डायरेक्टर कपिल शिंदे यांनी दिली
कारखाना परिसरातील गावातून ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी गाळपाला उस दिला होता अशा ऊस उत्पादकांना दिवाळी गोड करण्यासाठी गावोगावी जाऊन सवलतीच्या दरात कारखान्याने साखरेचे वाटप केले आहे. त्यामुळे गोकुळ शुगरला ऊस देण्याकडे अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. कारखान्याचे संस्थापक बलभीम शिंदे , डायरेक्टर विशाल शिंदे , जनरल मॅनेजर बाळासाहेब कुटे , मुख्य शेतकी अधिकारी अमरसिंह क्षीरसागर , प्रदीप गायकवाड , कार्तिक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.