सोलापूर : मोहोळ येथील सतीश क्षीरसागर याचा खून केल्याप्रकरणी पिंटू जनार्दन सरवदे, आकाश उर्फ गोटू नामदेव बरकडे व रमेश संगम सरवदे यांचा जामीन अर्ज शनिवारी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी फेटाळला. संशयित आरोपींच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षातर्फे ऍड. प्रदिपसिंग राजपूत यांनी हरकत घेतली.
मोहोळ नगरपरिषदेच्या 2021 मधील निवडणुकीच्या अनुषंगाने वॉर्ड क्र. आठ व नऊमध्ये बोगस मतदारांची नावे नोंदविल्याप्रकरणी सतीश क्षीरसागर व त्याच्या मित्राने तहसिलदारांकडे हरकत घेतली. त्याची उपविभागीय चौकशी लागली. तसेच रमाई घरकूल योजनेअंतर्गत 189 जणांना घरकूल मंजूर झाले. त्यावेळी मयत सतीश क्षीरसागर याच्यासह त्याच्या मित्रांची नावे होती. परंतु, त्यातील 28 फाईल्स काही दिवसांनी गायब झाल्याचे दिसून आले. त्यावेळी सतीशने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी नगरपरिषदेसमोर आंदोलनही केले.
सतीश क्षीरसागर हा नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराविरुध्द आंदोलन करीत होता. त्यामुळे संशयित आरोपी सतीशवर चिडून होते. 14 जुलै 2021 रोजी संशयित आरोपींनी सतीशला जीवे ठार मारण्याच्या हेतूने त्याच्या दुचाकीचा पाठलाग करून मागून टेम्पोची धडक दिली. त्या अपघातात सतीशचा मृत्यू झाला. संशयित आरोपींना मोहोळ पोलिसांनी अटक केली असून त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. दरम्यान, संशयित आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची व जनतेची फसवणूक केली आहे.
त्यांनी सतीश क्षीरसागर याचा कट रचून खून केला आहे. त्यांच्याविरुध्द सरकारी पक्षाकडे कॉल डिटेल्स व प्रत्यक्षदर्शी नेत्र साक्षीदार आहेत. आरोपी हे गुंडप्रवृत्तीचे असून त्यांना राजकीय वरदहस्त आहे. ते सरकारी साक्षीदार फोडू शकतात, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी ऍड. राजपूत यांनी न्यायालयाकडे केली. सरकारी पक्षाचा युक्तीवाद व साक्षीदारांचे जबाब व पंचनामे ग्राह्य धरुन न्यायालयाने संशयित आरोपींचा जामीन फेटाळून लावला. आरोपींतर्फे ऍड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.