सोलापूर : राष्ट्रीय महामार्गावरील वाहने अडवून, लोकांचे हातपाय बांधून, गाडीचे टायर काढून लूटमार करणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारांना जेरबंद करण्यात ग्रामीण ‘एलसीबी’ला यश आले आहे. गुन्ह्यातील ट्रकच्या 10 डिस्कसह टायर, गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल व इतर साहित्य असे एकूण 24 लाख मुद्देमालही जप्त करण्यात आली आहे.
चेन्नई येथून अशोक लेलॅंड कंपनीचे नवीन चेस मिक्शर घेऊन सुरत, गुजरात येथे जाण्याकरिता निघाले असता 13 ऑक्टोबर रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे सात ते आठ अनोळखी लोकांनी यातील फिर्यादी अजितसिंग बाबूलाल (रा. भोलडा) यांचे वाहन अडवून त्यांचे हातपाय दोरीने बांधले व रोडपासून अंदाजे 100 मीटर अंतरावर पडीक शेतामध्ये नेऊन गाडीचे 10 टायर डिस्कसह काढून, डिझेल, बॅटरी, टूलबॉक्स, मिक्शर पाइप तसेच मोबाईल व रोख रक्कम आदी साहित्य जबरदस्तीने काढून घेतले. या अनोळखी लुटारूंनी त्यांच्यासोबत आणलेल्या रोडच्या बाजूस उभा केलेल्या दुसऱ्या एका मोठ्या ट्रकमध्ये हे साहित्य घेऊन गेल्याची घटना घडली.