अकलूज : अकलूज – हैद्राबाद या रूटवर चालणाऱ्या लालपरी अर्थातच एस.टी.महामंडळ बसच्या माध्यमातून दि. १७ व १८ ऑक्टोबर दरम्यान चालक लियाकत शेख व वाहक एम. कांबळे यांनी सन 2021 मध्ये सर्वाधिक उत्पन्न आणले असून रेकॉर्ड ब्रेक केली आहे.
एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून स्वतःच्या जीवाची आणि कुटुंबाची काळजी न करता कोरोनासारख्या महासंकटातही एसटीचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा बजावत आहे. महाराष्ट्राच्या रस्त्यावर दि. 01 जून 1948 ला पहिल्यांदा एसटी बस धावली. आपल्याला गाव खेड्यापर्यंत पोहोचवणारी, मामाच्या गावाची नेहमी आठवण करुण देणारी, तिच्या खिडकीत बसले की झाडे पळत आहेत असा भास होणारी, कॉलेजात जात असताना खिडकीतूनच रुमाल टाकून सीट बूक होणारी, हिरव्या रंगाच्या सीट, रंग उडालेले लोखंडी रॉड, धावत असताना खडखड वाजणाऱ्या खिडक्या, पावसाळ्यात टपकणारे छत असणारी लाल परी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस हे आपण सर्वजण जाणतोच. त्यात दि. 18 ऑक्टोबर 2021 रोजी अकलूज – हैदराबाद वेळ :- 07.45 वाजेच्या दरम्यान उत्पन्न रूपये ₹ 41,870/- चालक एल. बी. शेख (16873) आणि वाहक एम. ए. कांबळे (93299) सन 2021 मधील सर्वात जास्ती प्रवासी उत्पन्न आणले आहे. त्याबद्दल या दोघांच्या चांगल्या प्रयत्न व योगदानाबद्दल रा. प. प्रशासनाच्या वतीने कर्तव्याशी प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे त्रिवार अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना काळात सर्वाधिक एस. टी. महामंडळाचे काम
कोरोना काळात सर्वाधिक कार्य एस. टी महामंडळातील चालक आणि वाहक यांनी काम केल्याचे आपण सर्वांनी पहिलेच आहे. भीतीपोटी मूळ गावी पायपीट करत जाणाऱ्यांना एस. टी बस ने सहारा दिला. त्यांना राज्याच्या सीमेवर सोडले. तर मुंबई लोकल बंद असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ने – आण करण्यासाठी एस. टी बस नेच सहारा दिला.