बार्शी : पैशांच्या वादातून मुलाने डोक्यात दगड घालून आईचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून फरफटत नेऊन घराच्या संरक्षण भिंतीलगत झुडपात टाकले. पोलिसांना फोनवरुन खबर मिळाल्यामुळे मंगळवारी (दि. १२) सकाळी सव्वाआठच्या सुमारास येथे ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुलाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
रुक्मिणी नागनाथ फावडे (वय ४५, रा. वाणी प्लॉट) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर श्रीराम नागनाथ फावडे (वय २१) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. वाणी प्लॉटमधील शिंदे यांच्या घरी फावडे राहतात. त्यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये एका प्लास्टिकमध्ये महिलेचा मृतदेह आहे, असा फोन मंगळवारी सकाळी पोलिसांना आला. यामुळे घटना उघडकीस आली.