मावळ : भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळमधून महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागलीय. महाविकास आघाडीतील तीन पक्षात आपसांत रोज लढाई लागलेली आहे. त्यातील दोन पक्षांचे संकेत आपल्याला मिळतात. या सर्वांचा अभ्यास केला तर राज्यात कधीही निवडणूक लागेल, असं भाकितच आशिष शेलार यांनी केलंय. त्याचबरोबर महाविकास आघाडीचं हे सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असल्याचा घणाघातही शेलार यांनी केलाय.
मावळ तालुक्यातील बूथ प्रमुखाचे चेहरे पाहिल्यावर मावळात कमळ फुलेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केलाय. मावळातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख हे बाजीप्रभू आहेत. बूथ प्रमुखच भाजपच्या यशाचा मानकरी आहे. देशातील भाजपचे जे प्रमुख आहेत, ते सर्व एका बूथचे प्रमुख आहेत, असं शेलार म्हणाले. भाजप कार्यकर्त्याला पोलीस, सरकारी अधिकारी त्रास देत आहेत. असं करु नका. ते तुमच्या हिताचं नाही. जो बेकायदेशीर काम करत होता, तो गृहमंत्री असला तरी आता वॉन्टेड आहे. पोलीस अधिकारीही वॉन्टेड आहेत, असा इशाराही शेलार यांनी पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिलाय.